Preface
हे कवितांचं पान. शाळेत असल्यापासून पाचवी सहावीतच मी कविता लिहू लागलो. एरवी अवांतर वाचनात वा अभ्यासातही मी कधी फारशी गती दाखवली नव्हती. पण मला हे अंग आहे असं पाहिल्यावर त्याला पाहिजे तसं खतपाणी घालून मला कवी पदाला पोहोचवण्याचं सगळं श्रेय माझ्या कै. सौ. आईला.
मला माझ्या हुंदडण्यातून बाहेर काढून या अपार सृजनानंदाची ओळख करून देण्यासाठी तिला किती कौशल्य पणाला लावावं लागलं असेल याची आता कल्पना येते. कुठेही तिचं भाषण असलं की तिचं शेपूट म्हणून मी असायचाच. त्यावेळी अनेक गाफिल श्रोत्यांना माझ्या चिमखड्या बोलांची शिकार व्हावं लागलेलं आहे. एक कविता महाराष्ट्र टाईम्समधेही आली. पेपरमधे नाव छापून आलं म्हटल्यावर माझा भाव जबरी वाढला.
पारल्याच्या भाईदास हॉलमधे एकदा खूप मागे विविध भारतीय भाषांतील कवींचं सम्मेलन होतं. मध्यंतरात मला काखोटीला मारून आई सरळ आतमधे घुसली. मग काय थेट आपल्या बापट, पाडगांवकरांपासून ते हिंदी, गुजराथी, अगदी उर्दू कवींना सुद्धा माझ्या सावरकरी पीळाच्या 'देशभक्तिपर' कविता ऐकण्याची संधी मिळाली. बहुदा निदा फाजलीही होते. मी अश्या वयात होतो की लाज, संकोच वगैरे व्यवस्थित समजत होतं पण तिथे लाजून बाहेर आल्यावर गाल लाल करून घेण्याचा धोका मोठा होता. आश्चर्य असं की चहापाणी करत असलेले सगळे कवी जाम खुष झाले. वसंत बापटांनी तेव्हा सांगितलेली एक गोष्ट कायम स्मरणात राहिली आहे. "आपल्याला एखादवेळी वाटतं, ही ही कविता जमली नाही पण ते ठरवण्याचा अधिकार आपला नाही कविता ही करतच रहायचं. असं करत रहाण्यानंच माध्यमावर ताबा येतो"!
या अशा प्रसंगांमुळे पण सादरीकरणातील सफाई आणि आत्मविश्वास प्राप्त झाले. बापटांच्या त्या कानमंत्राचं तंतोतंत पालन मी कधी केलं नाही आजपर्यन्तचा सगळा प्रवास चाचपडत, अडखळत, थांबत थांबत असाच झालेला आहे. काही कवितांच्या मधला कालावधी एकेक वर्षाचा सुद्धा आहे. मीही अजून म्हणावा तसा कवी नाही. त्यामुळे या इथे तुम्हां सर्वासमोर ठेवत असलेला मजकूर 'for your kind information only' अशाच स्वरूपाचा आहे .
माझ्या पत्नीच्या आग्रहामुळे नि कल्पकपणामुळे मागे एका छोटेखानी कार्यक्रमात या कवितांचं प्रकाशन झालं संग्रहाचं नावही तिनेच निवडलेलं, 'भेट'!
या कविता वाचल्यावर आपल्या प्रतिक्रीया बिनदिक्कत मला कळवा मला आवडेल .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा